बहुरुपी रामकथा
बहुरुपी रामकथा
"जोवरी हे जग, जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण" असा विश्वास दृढ करत रामकथा वेगवेगळ्या प्रदेशात रुढ झाली आहे. त्या त्या प्रदेशाचं रुप लेवून त्या ठिकाणच्या जनमानसात रुजली आहे. चीन, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया,जपान या प्रदेशांमध्ये रामकथेने घेतलेली स्थानिक रुपे 'बहुरुपी रामकथा' या डॉ अरुणा ढेरे संपादित बहुरुपी रामकथा या ग्रंथातून वाचताना एकाच वेळी अभिमान आणि हताशा वाटत राहते.
केवळ बृहद् भारत म्हणजे भारताचा प्रभाव, व्यापरी संबध जिथपर्यंत पोचले होते ते देशच नव्हे तर भारतातल्याच अनेक प्रांत, समाज यावरही रामायणाने टाकलेला प्रभाव स्तिमित करतो. आपली कला केवळ देवासाठीच वापरावी असं काही बंधन इथे नव्हतं पण मौखिक संस्कृतीमुळे कित्येक कवींच्या लेखकांच्या रचना काळाच्या उदरात गडप झाल्या असणार. पण त्याच वेळी १५ व्या शतकातल्या मोल्ल या तेलुगू कवयित्रीने रचलेली रामकथा तेलुगू भाषेत अजरामर होते किंवा १६ व्या शतकातल्या बंगाली चंद्रावतीने रचलेली रामकथा १९ व्या शतकात पुनरुज्जीवित होते याचं श्रेय त्या रचनांएवढंच त्या रामकथेला आहे हे नक्की. कारण रामकथा बहुसंख्यांना माहित असल्यामुळे कवनातल्या भावभावना लोकांपर्यंत सहज पोचत असणार आणि त्यांच्या मुखात रुळत असणार. त्यातून साधी सरळ नाती, फार क्लिष्ट नसलेली मानसिक आंदोलने. मग परिचित साज लेवून आलेले राम सीता आपलेसे करणे त्या त्या प्रदेशाला अगदी सहज शक्य झाले असणार.
या पुस्तकाची प्रस्तावना वाचनीय आहे. वाल्मिकीरामायणाच्या बऱ्याच आधीपासून रामकथा प्रचलित होती याचे प्रमाण वाल्मिकी रामायणात मिळते. एखाद्या थोर पुरुषाविषयी उत्तम काव्यरचना आपल्या हातून व्हावी अशी वाल्मिकींची इच्छा आणि नारदांनी इक्ष्वाकुकूल रामाचे नाव सुचवले. या बालकाण्डातल्या प्रसंगाविषयी सांगत अरुणा ढेरे हे बालकाण्ड उत्तरकाण्डासारखेच प्रक्षिप्त असल्याचं अभ्यासकांचं मत असल्याचं सांगतात. भारतताबाहेर अधिकतर पोचलेल्या रामकथा या बौद्ध रामकथा आहेत असंही त्यांनी नमूद केलं आहे.
वाल्मिकीच्या रामकथेचा अनुकार संपूर्णपणे पुढच्या रचनाकारांनी केलेला नसला तरी पुढची बरीच रामायणे ही वाल्मिकी रामायणाच्या चौकट स्वीकारुन रचली गेल्याचं त्या म्हणतात त्याच वेळी अनेक प्रादेशिक रामायणे ही रामकथेचा पूर्ण वेगळा तपशील , वेगळी चौकट आणि वेगळे नातेसंबध दाखवणारी आहेत हेसुद्धा त्या स्पष्ट करतात. खरेतर रामायणाचे विकसन तीन स्रोतांमधून झाले असे सांगताना बौद्ध आणि जैन स्रोतांचा उल्लेख स्पष्ट करतात. कदाचित संस्कृत भाषेतील वाल्निकी रामायण हा तिसरा स्रोत असा अर्थ यातून काढता येतो. त्यातले बौद्ध आणि जैन रामायण जुने असल्याचं त्या सांगतात. भारताबाहेर गेलेली बरीचशी रामायणे ही बौद्ध रामायणे असल्याचंही त्या सांगतात. पण बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करायला रचलेल्या आणि त्यातून बौद्ध तत्वज्ञानाचा विस्तार होत असलेला बघून रामायणाची रचना झाली, असाही एक मतप्रवाह आहे याचा स्पष्ट उल्लेख टाळला आहे. अर्थात जोत्स्ना खरे यांच्या लेखातली गाथा स्वरुपातली रामकथा गाण्याची परंपरा वाल्मिकीरामायणाच्या आधीपासून असल्याचं म्हटलं आहे. रामकथा हे निसर्गकथेचं मिथक म्हणून रचल्याचं ए. के रामानुजम यांचेही मत त्या उद्धृत करतात.
रामकथेने घेतलेली स्थानिक रुपे म्हणजे राम हा हिंदू अस्मितेचे प्रतिक नव्ह्ता हे दाखवून देते. शैव-वैष्णव वाद कोणत्या टोकाला जात होते हे सर्वश्रुत आहे. पण रामकथा मात्र सगळ्या प्रदेशात स्वीकारली गेली. इतर देशच नव्हे तर आपल्या देशातही रामकथा एकाच रुपात नाही. "हे असंच पाहिजे नाहीतर संस्कृतीचा अपमान .." असं म्हणत उसळून उठणाऱ्या समस्त देशभक्तांनी, सकल हिंदूनी हे वाचावं. "मुसलमान, मोगल " हे शब्द शिवीसारखे वापरणाऱ्यांनी फारसी रामायण किंवा मोपल्ला रामायण याबाबत माहिती करुन घ्यावी. फारसी रामायण हा लेख वाचण्यासारखा आहे. आपल्या मातीतल्या कथेने एवढं आकर्षण निर्माण कराव याचा अभिमान वाटतो, अकबराच्या किताबखाना आणि कारखान्याबद्द्ल वाचताना असाही आपला वारसा आहे याचा अभिमान वाटतो.
अर्थात हा पुस्तकाचा एक भाग झाला. पण हा राम काव्य, जनमानस यातून उठून वर्तमानात धार्मिक दुराग्रह निर्माण करता कसा झाला याच्या किंचितसा का होईना वैचारिक अपश्रेयाचा वाटा या पुस्तकातल्या काही लेखांना जाऊ शकतो. गेली काही दशके भारत राममय झाल्याचं भासतंय. म्हणजे बाकी कशात काही राम नसला तरी बेगडी चमक डोळे आंधळे करुन सोडतेय. केवळ एखाद्या बाजूचे, नेत्यांचे बगलबच्चे असणारे, केवळ अंगातली मस्ती दाखवायचा सोस असणारे सोडा, पण मध्यमवर्गीय, वाचन असणारे सुद्धा दोन हजार वर्षांचा वनवास वैगेरे सांगत वातावरण निर्माण करतात. राम म्हणजे ऐतिहासिक पुरुष होता आणि रामायणात वर्णिलेलंच जीवन जगला, त्याच्या खुणा जागोजागी आहेत असा भ्रम निर्माण करणाऱ्या लिखाणाची अनेक उदाहरणे इथेही आहेत .खास करुन प्रणव गोखलेंचे लेख. सर्वात जास्त त्यांचेच लेख इथे आहेत.त्या लेखांमध्ये चिकित्सक बुद्धी, प्रमाण सिद्धता या ऐवजी बुद्धीवादाचा मुखवटा पांघरलेला भोळा भक्तीभाव दिसतो. अप्रामाणिक बुद्धीमत्ता हा भारतीय मातीतला खास विशेष तो या लेखांमध्ये आढळतो.
रामायणाचे श्रुतीसंदर्भ हा लेख यांचं उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल. खरेतर हा लेख म्हणजे सत्य मांडण्याऐवजी त्याचे उल्लेख करतही त्यावर वेगवेगळी कलाबूत लावून वेगळंच काही दाखवण्याचा प्रयत्न कसा केला जातो याचं उत्तम उदाहरण आहे. संशोधनाअंती गाथा स्वरुपातून रामकथा पुढे आल्याचं नाकारता येत नाही. मग वेदात रामाचे, दशरथाचे उल्लेख आहेत यावर वेगवेगळ्या प्रकारे भाष्य करत आपलेच आधीचे विधान नाकारणारे पुढचे विधान त्यातून आधीच्याच विधानाला पुष्टी देता येईल अशा प्रकारचा युक्तीवाद. संगणकाच्या प्रोग्रॅमची जशी सुटी मांडणी असते तशी ही विधाने व्यवस्थित अर्थ काढून वाचत गेली की आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्याच्या विरुद्ध दिशेच्या पुराव्यांचा उल्लेख करुनही, काही ढोबळ वाक्याच्या आधारे आपल्या सिद्धांतांचीच मांडणी करत जाणे हा अप्रामाणिकपणा सहज लक्षात येतो. त्यातून तौलनिक दृष्ट्या वाचन नसणाऱ्यांना बौद्धिक वाचल्याचा फील येतो.
रामायणाचे पुराण या लेखात अनेक उलट्या सुलट्या उड्या मारत पुराणे म्हणजे इतिहास असं म्हणायचा प्रयत्न केला आहे. अतिशय विस्कळीत असा हा लेख. पुस्तकाच्या पहिल्या भागातले लेख बरेचसे याच स्वरुपाचे आहेत. काहीतरी गवसल्याचं , मुद्दा कळल्याचं समाधान या लेखांमधून मिळत नाही. आता रामाच्या नावाखाली जो बाजार मांडला जातोय त्याचं वैचारिक मूळ या लेखांमधून दिसते.
Comments
Post a Comment