बहुरुपी रामकथा
बहुरुपी रामकथा "जोवरी हे जग, जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण" असा विश्वास दृढ करत रामकथा वेगवेगळ्या प्रदेशात रुढ झाली आहे. त्या त्या प्रदेशाचं रुप लेवून त्या ठिकाणच्या जनमानसात रुजली आहे. चीन, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया,जपान या प्रदेशांमध्ये रामकथेने घेतलेली स्थानिक रुपे 'बहुरुपी रामकथा' या डॉ अरुणा ढेरे संपादित बहुरुपी रामकथा या ग्रंथातून वाचताना एकाच वेळी अभिमान आणि हताशा वाटत राहते. केवळ बृहद् भारत म्हणजे भारताचा प्रभाव, व्यापरी संबध जिथपर्यंत पोचले होते ते देशच नव्हे तर भारतातल्याच अनेक प्रांत, समाज यावरही रामायणाने टाकलेला प्रभाव स्तिमित करतो. आपली कला केवळ देवासाठीच वापरावी असं काही बंधन इथे नव्हतं पण मौखिक संस्कृतीमुळे कित्येक कवींच्या लेखकांच्या रचना काळाच्या उदरात गडप झाल्या असणार. पण त्याच वेळी १५ व्या शतकातल्या मोल्ल या तेलुगू कवयित्रीने रचलेली रामकथा तेलुगू भाषेत अजरामर होते किंवा १६ व्या शतकातल्य...